नाशिक : मागील दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यातील गोदाकाठ पंचक्रोशी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्याने तारुखेडले गावातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.तारुखेडले गावातील एका ऊसाच्या शेताच्या बांधालगत असलेल्या एका शेतमजूराच्या घराजवळील अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर बिबट्याने संध्याकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती. तेव्हापासून वनविभागाने या भागातील उसाच्या शेतांमध्ये पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या अडकणार कधी? असा प्रश्न रहिवाशांना पडला होता. नागरिकदेखील बिबट्या जेरबंद होण्याची प्रतिक्षा करत होते. अखेर शनिवारी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पुर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. काही दिवसांपुर्वीच चापडगाव, भुसे, मांजरगाव परिसरातदेखील रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने पांथस्थांना दर्शन दिले होते. तारुखेडलेपासून काही अंतरावर असलेल्या तामसवाडी गावातही बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करीत चार कोकरू ठार केले होते. अद्यापही गोदाकाठ बिबट्याच्या दहशतीने थरथरला आहे. या भागात उसशेतीचे मोठे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांसाठी अन्न व निवारा या दोन्ही गोष्टी सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे बिबट्यांची या भागात संख्या वाढल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. सातत्याने गस्त व पिंजरे जास्त संख्येने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांवर विश्वास दाखवून संबंधित परिसरात लावण्याची मागणी होत आहे.
तारुखेडले गावात बिबट्या जेरबंद : निफाड तालुका
By admin | Published: June 24, 2017 2:19 PM