पाळे खुर्द : गेल्या काही दिवसापासून कळवण तालुक्यातील पाळे व असोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आसोली गावातील शेतमजूर भाऊसाहेब बाळू मुकणे यांच्या घरासमोरील शेळीचा बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास फडशा पाडला. नागरिकांना रात्रीच्यावेळी बाहेर पडणे अवघड झाले आहे.
या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कळवण तालुक्यात उन्हाळी शेतीचा हंगाम सुरु आहे. दिवसा पूर्ण शक्तीने वीजपुरवठा होत नसल्याने येथील प्रमुख पीक गावठी कांदा, गहू भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागरण करून पाणी द्यावे लागत आहे. असे असताना आसोली व पाळे शिवारात गेल्या दहा दिवसापासून बिबट्याची दहशत पसरली आहे.
शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासही जाता येत नाही आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आसोली गावातील शेतमजूर भाऊसाहेब बाळू मुकणे यांच्या घरासमोरील शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वन परिमंडळ अधिकारी निकम व हिरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. यापरिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.बिबट्याने शेळी फस्त केल्याची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली आहे. शेळीला ओढून नेल्याच्या बिबट्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार दोन दिवसात या ठिकाणी पिंजरा लावला जाईल.-योगीराज निकम, वन परिमंडळ अधिकारी, अभोणा