सायखेडा : निफाड तालुक्यातील भुसे, म्हाळसाकोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरंबद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
या बिबट्याने परिसरातील वासरे, अनेक कुत्रे फस्त केली होती, शेतात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करत वनविभागाला पिंजरा लावण्यास भाग पाडले. या पिंजऱ्यात दोन दिवसांनी अलगद बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला आणि पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर पिंजऱ्यात अडकलेला नर आहे आणि याच भागात मादी असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. दोघांनाही सोबत फिरताना पाहिले असल्यामुळे मादीला पकडण्यासाठी नवीन पिंजरा याच भागात लावला आहे.
भुसे येथील ज्ञानेश्वर आघाव यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करीत त्याला ठार केले होते. त्यानंतर लागलीच ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. त्यांनतर साेमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांत याच बिबट्याने ४-५ जनावरांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याच्या घटना भुसे गावात घडल्या आहेत.
----------------------
भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे वस्तीकडे
या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परिणामी, अनेकदा भक्ष्याच्या शोधात बिबटे वस्तीकडे येतात. अनेक वेळा महावितरणकडून सायंकाळी वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. अशावेळी जीव मुठीत घेऊन शेतकरी काम करीत असतात. यातून अनेकदा बिबट्याने हल्लेही केले आहेत. त्यामुळे दिवसा वीज मिळाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी करत आहेत, तसेच कायमस्वरूपी बिबट्याची दहशत संपवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
--------------------
भुसे शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वनविभागाला कळवूनही पिंजरा लावत नव्हते. मात्र, ‘लोकमत’मध्ये बातमी आली आणि तात्काळ पिंजरा लावला. बिबट्या अखेर जेरबंद झाला असला तरी परिसरात आणखी बिबट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो पकडले जावा.
- ज्ञानेश्वर आघाव, शेतकरी
---------------------------
भुसे येथे ज्ञानेश्वर आघाव यांच्या शेतात पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या. (२८ सायखेडा १/२)