चांदोरी : निफाड तालुक्यातील लालपाडी येथे एका शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा नर बिबट्या अंदाजे सहा वर्षाचा आहे. सानप यांच्या शेतात तीन महिन्यात चक्क चौथा बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील लालपाडी परिसरात बिबट्याचे दर्शन होत होते. पंंधरा ते वीस दिवसांपूर्वी लालपाडी येथे माणिक जगन्नाथ सानप यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. १५ दिवसांपूर्वी वनविभागाने सानप यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर गुरुवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजºयात अडकला. ही घटना सकाळी लक्षात आली. सदरची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर येवला विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड विभागाचे वनपाल जी. बी. वाघ, वनरक्षक विजय टेकणार, वनसेवक भय्या शेख, आर.एल. बोरकडे आदीचे पथक लालपाडी येथे गेले बिबट्यास ताब्यात घेतले. वनविभागाच्या वाहनातून निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. या केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी बिबट्याचीतपासणी केली. गुरुवारी रात्री उशिरा बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
लालपाडीत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:59 PM