निफाड : तालुक्यातील तारु खेडले येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शनिवारी (दि. ३०) उघडकीस आले. हा मादी बिबट्या अंदाजे तीन वर्षांचा आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्याच्या कालावधीत पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्काळ तारु खेडले येथील शिवाजी जगताप यांच्या शेतात २० मे रोजी पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शनिवारी (दि. २०) सकाळी उघडकीसआले. ही खबर वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल जी.बी. वाघ, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख, भगवान बुरुक आदींनी बिबट्यास ताब्यात घेतले व वनविभागाच्या वाहनातून निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले.याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी बिबट्याची तपासणी केल्यानंतर बिबट्याला जंगलाच्या अधिवासात सोडण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. बिबट्या जेरबंद झाल्याने तारु खेडले परिसरातील शेतकरीवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर या भागात आणखी दोन बिबटे असल्याची शक्यताही शेतकºयांनी वर्तवली आहे.
तारु खेडले येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:36 PM