मौजे सामनगाव येथील शेतकरी मंदाबाई गणपत जगताप यांचे शेत गट नंबर ४२६ मध्ये उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने बुधवार (दि.३१) रोजी दुपारच्या सुमारास शेळी फस्त केली. त्याबाबतची माहिती पंचायत समिती सदस्य अनिल जगताप यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल आहिरराव यांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावला होता. सावजाच्या शोधात आलेला बिबट्या शुक्रवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून येथील शेतकरी राणा जगताप यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची खात्री करून त्यांनी वनविभागास कळविले. वनरक्षक गोविंद पंढरे आदींनी बिबट्या अडकलेला पिंजरा टीमच्या सहाय्याने व्हॅनमध्ये रेस्क्यू करून गंगापूर येथील रोपवाटिकेत हलविले.
सामनगाव शिवारात अजूनही दोन ते तिन बिबटे वावरत असून पिंजऱ्यात अडकलेली बिबट मादी होती. त्यामुळे नर बिबट्याचे वास्तव्य येथे असावे, असा कयास वनविभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तो आता अधिक आक्रमक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (फोटो ०३ बिबट्या)