आझादनगर : तालुक्यातील डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. उपाशीपोटी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावेद खाटीक व वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांच्याकडून वर्तविण्यात आला.शुक्रवारी (दि.१०) रात्री तालुक्यातील डोंगराळे शिवारातील कारभारी शांताराम पगारे यांच्या गट क्रमांक ६४ मधील शेतात बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती डोंगराळे येथील सतीश पितांबर भदाणे या शेतकºयाने वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या वनपाल व्ही. एस. बोरसे, भानुदास सूर्यवंशी, वनरक्षक अशोक शिंदे, देसाई, गोयेकर, हिरे व अहिरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचा पंचनामा करीत रात्री १२ वाजेच्या सुमारास लोणवडे रोपवाटिका केंद्र येथे आणण्यात आले होते.आज दुपारी १२ वाजता वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासक सतीश खरे यांच्या उपस्थितीत डॉ. जावेदखाटीक, शिवाजी गुडघे यांनी पंचनामा करीत शवविच्छेदन केले. यात प्रथमदर्शनी भुकेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कयास वर्तविण्यात आला असला तरी न्यायवैधक चाचणीच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी दिली.
बिबट्या मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:02 AM