कालव्याच्या परिसरात गतवर्षाप्रमाणेच यावर्षीही बिबट्याची भटकंती पहावयास मिळत आहे. ऊन्हाचा तडाखा वाढल्याने अन्न, पाण्याच्या शोधात बिबट्या कालव्याच्या भागात फिरत असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आडगावजवळ लोकवस्ती असल्याने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. आडगाव परिसरात शेतमळे अधिक असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बिबटयाचे दर्शन घडल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दरम्यान, वनविभागाने शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मळे परिसरात शेतीची कामे करण्यासाठी शक्यतो एकट्याने जाऊ नये, तसेच रात्रीच्यावेळी शेतीत जाणे टाळावे, तसेच शेतीला लागून राहणाऱ्या शेतमजुरांनी लहान मुलांना रात्री उघड्यावर सोडू नये, किंवा नैसर्गिक विधीसाठी बसवू नये, अशा सुचना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.१६) घटनास्थळी दिलेल्या भेटीत केल्या. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे यांनी आळंदी कॅनॉल तसेच शिंदे वस्तीजवळ भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत येत्या एक ते दोन दिवसांत या ठिकाणी पुन्हा निरिक्षण करुन पिंजरा तैनात करण्यात येणार असल्याचे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे.
आडगाव शिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:16 AM