किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आश्चर्यचकित करायला लावणारी आहे. एकूण १५१ उमेदवारांमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर असून, ११ उमेदवारांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. उर्वरित उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत झालेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमधील सर्वच उमेदवारांचे शिक्षण सुमार जेमतेम झाले आहे. यात कोणीही उच्चशिक्षित नाही. तालुक्यातील जिल्हा परिषदमधील सात गटांमध्ये अद्याप माघारीपूर्व ५३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी फक्त चार उमेदवार पदवीधर आहेत, तर पदव्युत्तर चार, बारावी झालेले १५, दहावी झालेले १२ व पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले तब्बल १६ उमेदवार आहेत. दोन उमेदवारांनी तर शाळेचे तोंड पाहिलेले नाही. यात प्रमुख लढत असलेल्या शिवसेना-भाजपाने अनेक पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले व शाळेत न गेलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षांची तिकिटे देऊन उमेदवारी बहाल केली. हीच स्थिती १४ गणांमध्येही अशीच आहे. गणांमध्ये विविध पक्षांचे एकूण ९८ व अपक्ष उमेदवार रिंगणात असून, या उमेदवारांमध्ये पदवीधर- ११, पदव्युत्तर- ९, बारावी- १७, दहावी- २०, तर पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण झालेले तब्बल ३२ व अशिक्षित ९ उमेदवार रिंगणात आहेत. येथेही उच्चशिक्षित उमेदवारांचा अभाव दिसून येतो. येथे शिवसेना, भाजपातर्फे अनेक अल्पशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. १४ गणांमधील चिखल ओहोळ या नागरिकांचा मागास प्रवर्ग गणामध्ये एकूण सहा उमेदवार आहेत. यातील एकाही उमेदवाराने दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले नाही. यात चार उमेदवार पाचवी व दोन उमेदवार नववीपर्यंत शिकलेले आहेत. तीच परिस्थिती दाभाडी अनुसूचित जाती महिला या गटात पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचीही दहावीपर्यंत मजल मारलेली नाही. यातील एक उमेदवार नववी, दोन उमेदवार पाचवीपर्यंत शाळा केली आहे. तर उर्वरित दोन उमेदवारांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. यातील एका उमेदवार भाजपाकडून उमेदवारी करत आहे. यामध्ये एकूण निवडणुकीत १५१ उमेदवार असले तरी माघारीनंतर ही संख्या कमी होणार आहे.
कमी शिकला पण उमेदवारीत टिकला
By admin | Published: February 12, 2017 10:30 PM