नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी नवीन बाधितांची संख्या ४४१वर पोहोचली असून, ४९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २ आणि नाशिक शहरात तीन याप्रमाणे ५ मृत्यूची गुरुवारी नोंद झाली असून, त्यामुळे मृतांची संख्या १,७७८ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारपासून काहीशी अधिक प्रमाणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील समाधानकारक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९९,८२२ रुग्ण बाधित आढळले असून, त्यातील सर्वाधिक बाधित हे ६५,९१४ रुग्ण हे नाशिक मनपा क्षेत्रातील आहेत, तर नाशिक ग्रामीणचे २८,७९९ , मालेगावचे ४२९३, तर जिल्हाबाह्य ८१६ बाधितांचा त्यात समावेश आहे. तसेच आतापर्यंतच्या १७७८ मृतांमध्ये ९०२, नाशिक शहरातील ६६३ नाशिक ग्रामीणमधील, मालेगाव मनपा क्षेत्रातील १७१, तर जिल्हाबाह्य ४२ मृतांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी ९५.५१ टक्के आहे, तर प्रलंबित अहवालांची संख्या १६४५वर पोहाेचली आहे. जिल्ह्यात २७०५ रुग्णांवर उपचार सुरू असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण त्या तुलनेत अत्यल्प आहे. जिल्ह्यातील बाधित ९९,८२२ रुग्णांपैकी ९५,३३९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने जिल्ह्यासाठी तेवढा दिलासा आहे.