नाशिक : गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी (दि.२०) तब्बल वर्षभराच्या काळानंतर एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा सहाने कमी होऊन ९९४ पर्यंत खाली आली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८१ रुग्ण बाधित झाले असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये ४७ नाशिक ग्रामीणचे, ३१ नाशिक मनपा, २ जिल्हा बाह्य, १ मालेगाव बाह्यचा रुग्ण आहे. दरम्यान जिल्ह्यात केवळ नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा बळी गेला असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ८५५८ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ६६८ वर आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे २९८, नाशिक मनपाचे १५१ तर मालेगाव मनपाचे २१९ अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६४
जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनामुक्त नागरिकांच्या प्रमाणातही किंचितशी वाढ होऊन ते ९७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक ९८.०४ , तर जिल्हा बाह्य रुग्णांचे कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६४, नाशिक ग्रामीणचे ९७.०४ तर मालेगाव मनपाचे ९६.८४ टक्के इतके आहे.