नाशिक : अचानकपणे उद्भवणाºया अपात्कालिन स्थितीत किंवा अपघातसमयी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वसामान्यांनी न घाबरता पुढे येणे आवश्यक आहे. अशावेळी रुग्णवाहिक ा अथवा वैद्यकिय मदत पोहचेपर्यंत अत्यवस्थ व्यक्तीचा बंद पडणारा श्वासोच्छवास जीवन संजिवनी शास्त्रोक्त क्रियेद्वारे सर्वसामान्य व्यक्तीही सुरू ठेवून जीवन संजिवनी देऊ शकतो, असा सूर तज्ज्ञांच्या परिसंवादातून उमटला.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ‘जीवन संजिवनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेसिओलॉजिस्ट संघटनेच्या नाशिक शाखेच्या डॉ. अनिता नेहेते, डॉ. भावना गायकवाड, डॉ. जयश्री साळी, डॉ. सुनीता संकलेचा या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून रोटरीचे अध्यक्ष दिलिपसिंह बेनिवाल, माजी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीशा मंडोरा उपस्थित होते. यावेळी जीवन संजीवनी प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न उपस्थित तज्ज्ञांनी केला.
यावेळी अपात्कालिन परिस्थितीत अत्यवस्थ व्यक्तीस प्रथमत: उठविण्याचा प्रयत्न करावा तसेच इतरांना मदतीसाठी बोलवावे. व्यक्ती बेशुध्द असेल तर तत्काळ १०८ या संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवावी. तोपर्यंत जीवन संजीवनीच्या शास्त्रीय पध्दतीचा अवलंब न घाबरता करावा.
घटनास्थळावरील बघ्यांची गर्दी दूर करुन श्वासोच्छवास पोट व छातीवर नजर टाकून तपासावा. रुग्णाचे कपडे सैल करुन हनुवटी वर उचलून डोके मागील बाजूस वाकवावे. त्यानंतर डाव्या हाताचा तळवा छातीच्या मध्यभागी ठेवून उजव्या हाताने त्यावर दाब देण्याचा प्रयत्न सुरू करावा, यावेळी बोटे एकमेकांत गुंतवून ठेवावी. रुग्णाच्या छातीचे हाड किमान पाच सेंमीपर्यंत खाली दाबण्याचा प्रयत्न करावा. मिनिटाभरात किमान शंभर वेळा दाबण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी नेहेते यांनी सांगितले. साळी, संकलेचा, गायकवाड यांनी प्रत्यक्षरित्या सदर संजीवनीक्रियेचे प्रात्याक्षिक सादर केले.