पिठोरी अमावस्येला साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर या वर्षी कोरोनाचे संकट आणि महागाईचे सावट असले तरी सोमवारी सकाळपासूनच शहरालगतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांची बैलपोळ्याची लगबग सुरू होती. दिवसभर शेतीकामे बंद ठेवून बैलांना सुटी देण्यात आली. दुपारनंतर अनेकांनी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या अंगावर नवीन साज चढवला. अनेकांनी बैलांच्या पाठीवर रंगीबेरंगी नक्षीकाम करीत शिंगांना बेगड लावून बाशिंग बांधले. अनेक उत्साही तरुणांनी बैलांच्या पाठीवर वेगवेगळे संदेश लिहून जनप्रबोधन केले. पिंपळगाव खांब येथील शेतकरी सोमनाथ बोराडे यांनी तर कृषी कायद्यांबाबतची घोषणा लिहिलेले फलक लावून अनेकांचे लक्ष वेधले. दिवस मावळल्यानंतर गावागावांत सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गावातील मारुती मंदिरासमोर बैलजोडीकडून सलामी देण्यात आली. मिरवणुकीने बैल घरी पोहोचल्यावर गृहिणींनी त्यांना मनोभावे ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य दिला. याबरोबरच घरोघरी मातीच्या बैलांचेही पूजन करण्यात आले.
कृषी कायदे रद्द होऊ दे, बळीराजाला न्याय मिळू दे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:19 AM