उत्तमनगर येथील श्रीराम मंदिर हे नवसाला पावणारे मंदिर असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, यावर्षी सलग दुसऱ्या वेळेस अतिशय साध्या पद्धतीने शासनाचे नियम पाळून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाची परिस्थिती पाहता इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. गोविंद जोशी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. सकाळी प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाता, प्रभू लक्ष्मण, बजरंगबली यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर, कोणत्याही भाविकाला दर्शनासाठी मंदिरात न येता मंदिर बंद ठेवण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष जिभाऊ बच्छाव यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाची आरती करण्यात आली. यावेळी हे प्रभू रामचंद्र पूर्ण जगावर, देशावर, राज्यावर व नाशिकवर जे कोरोनारूपी आजाराचे महाभयंकर संकट उभे राहिले आहे, ते तू दूर कर! सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य प्रदान करो, अशी प्रार्थना करण्यात आली.
(फोटो २१ राम) - उत्तमनगर येथील श्रीराम मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.