देवळाली कॅम्प : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या युवकांची लष्कर भरतीप्रसंगी चांगलीच धावपळ उडाली. हजारोंच्या संख्येने आलेल्या तरुणांमध्ये भरतीसाठी रेटारेटी झाल्याने उडालेल्या गोंधळात लष्कर आणि पोलिसांना सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. यावेळी झालेल्या धावपळीत अनेक तरुण जखमी झाले, तर रस्त्यावर त्यांच्या चपला-बूट विखुरले गेले तर काहींचे कागदपत्रेही गहाळ झाले. रविवारपासून सुरू झालेल्या या भरतीप्रक्रियेसाठी देशभरातील तरुणांचा लोंढा देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. सुमारे ९० जागांसाठी १५ हजारपेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवल्याने भरतीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. पुढे जाण्यासाठी तरुणांची चढाओढ लागल्याने जमाव विस्कळीत झाला आणि गोंधळलेल्या अवस्थेत रेटारेटीमुळे चेंगराचेंगरीचाही प्रकार घडला. त्यामुळे तरुणांच्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला लाठीमार करावा लागला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या धावपळ व चेंगराचेंगरीत काही तरुण जखमी झाले.लष्करी विभागाच्या पायदळ, भूदल म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक सेनेच्या ११६ पॅराट्रूप बटालियनमध्ये भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावली. तरुणांची गर्दी झाल्याने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. तरुणांचा लोंढा सातत्याने पुढे रेटत असल्याने अधिक बंदोबस्त वाढविण्यात आला. पहाटेच्या सुमारास भरतीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर युवकांची गर्दी झाल्याने लष्करी विभागाकडून गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. पहाटे झालेल्या धावपळीच्या घटनेत अनेकांचे बूट, चपला रस्त्यातच पडल्या, दोन ठिकाणी चारचाकी गाड्या फोडण्यात आल्याने पोलिसांनी दंगा निवारण पथक, क्यूआरटी, वाहतूक विभाग, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निरीक्षक, २०० पोलिसांसह गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या धावपळीत मात्र अनेक तरुण जखमी झाले.लाठीमारचा बसला फटकालष्कर भरतीसाठी रविवारी रात्रीपासूनच आनंदरोड मैदानावर महाराष्ट्रातील युवकांनी मोठी गर्दी केल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. लष्कराच्या टीए भरतीकरिता अपेक्षित संख्येपेक्षा जास्त युवकांनी हजेरी लावल्याने आनंदरोड मैदानालगत रस्त्यावर सकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने एकच धावपळ उडाली.लाठीचार्जच्या भीतीने भरतीकरिता आलेल्या युवकांमध्ये धावपळ उडाल्याने अनेकांना चेंगराचेंगरीचा फटका बसला. यावेळी काही युवक जखमी झाल्याचे व त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र पोलीस प्रशासनात याबाबत कुठलीही नोंद करण्यात आली नाही.भरतीसाठी पर राज्यांतून आलेल्या उमेदवारांसाठी देवळालीतील शिवसेना, मनसे यांसह गुरुद्वारा व झुलेलाल मंदिर येथे चहा, नाश्तासह दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मंगळवारी फक्त नाशिक जिल्ह्यातील युवकांकरिता भरतीप्रक्रिया होणार आहे.नाशिकचा पारा सध्या १० अंशांपेक्षा कमी असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. अशा कडाक्याच्या थंडीतही लष्करी भरतीसाठी दाखल झालेल्या तरुणांनी शेकोटीचा आधार घेत रात्र जागून काढली, तर कुणी चहाचा आधार घेत थंडीपासून बचाव करीत होते.
लष्कर भरतीप्रसंगी लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:42 AM