दाभाडी : दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत मुले मामाच्या गावी जातात. मात्र, मागील वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे मुलांची सुट्टी घरातच गेली. त्यामुळे आता कोरोना लवकर संपावा आणि मामाच्या गावाला जाण्याचा आनंद मिळावा, या प्रतीक्षेत मुले आहेत.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा कोरोना काळ संपेल व नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू होऊन उन्हाळी सुट्टी आनंदात जाईल, अशा अपेक्षा बाळगून असणाऱ्या मुलांचा पुन्हा यावर्षीही हिरमोड झाला. भर उन्हाळी सुट्टीत एप्रिल आणि मे महिन्यातच पुन्हा कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाल्याने शासनातर्फे यावर्षीही कडक लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे मागील वर्षाप्रमाणे या वर्षाच्या सुट्ट्याही विद्यार्थ्यांना आपल्या घरीच घालवाव्या लागल्या. त्यामुळे मामाच्या गावाला जाणे तर दूरच, घराबाहेरही पडणे मुश्कील बनले. वर्षभर बाहेरगावी न जाता आपल्याच घरी दिवसभर रहावे लागत असल्याने त्याचा गंभीर परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक बाबींवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
इन्फो
पर्यटनातील महसुलात घट सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांचाही मागील दोन वर्षांपासून हिरमोड झाला आहे. कोरोनाने पर्यटन व्यवसाय बंद पडला असून, पर्यटनप्रेमी यांच्या छंदाचेही नियोजन बिघडले आहे. गेल्या दीड वर्षापासून कोणतीही नवीन स्थळे किंवा आवडीची स्थळे यांना भेट देणे पर्यटकांना जमले नाही. त्यामुळे पर्यटनातून मिळणारा महसूलही घटला आहे.