नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे.पालकमंत्री गिरीश महाजन हे केरळ येथे वैद्यकीय पथकासह रवाना झाल्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार राहुल अहेर यांनी पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयात केरळ पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अहेर यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातर्फे पाच टन साखर, घोटीच्या राईस मिल असोसिएशनतर्फे ४ टन तांदूळ तसेच कांदा व्यापारी असोसिएशनने २० टन कांदा, नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि जिल्हा रुग्णालयातर्फे एक लाख रुग्णांना पुरेल इतका आपत्कालीन वैद्यकीय औषधांचा ट्रक रवाना करण्यात आला आहे.सदरचे साहित्य उद्यापर्यंत कोच्ची येथील मदत केंद्रात पोहोचणार असल्याचे पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले.कोणताही अधिभार नाही मालेगाव मर्चंट बॅँकेच्या वतीने एक लाख व जनकल्याण ट्रस्टच्या वतीने २५ हजार अशा प्रकारे सव्वा लाख रुपयांचा धनादेश मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, राजेंद्र भोसले, विठ्ठल बागुल, भास्कर पाटील यांनी सुपूर्द केला. केरळ पूरग्रस्तांसाठी रोख स्वरूपात मालेगाव मर्चंट बॅँकेच्या माध्यमातून मदत पाठवू इच्छिणाऱ्यांसाठी बॅँकेकडून कोणताही अधिभार आकारण्यात येणार नसल्याचे बॅँकेने म्हटले आहे.
केरळसाठी नाशिकमधून मदत रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:07 AM