लोकमत इनिशिएटिव्हनाशिक : सामान्य जनता सध्या ‘ट्रॅफिक जॅम’ने प्रचंड त्रस्त झालेली आहे. त्यातच होऊ घातलेल्या गणेशोत्सवात जर सार्वजनिक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे रस्त्यात विस्तृत मंडप टाकले तर शहराच्या मध्यवर्ती भागातील संपूर्ण वाहतूकच कोलमडून पडू शकते आणि मंडपालाच वाहनांचा गराडा पडू शकतो. त्यामुळे लाडक्या गणरायाला आणि सर्वसामान्य जनतेला कोंडीतून वाचविण्यासाठी मंडपांचा आकार कमी करण्याबाबत काही पुढाकार घेतला घेण्याची गरज आहे.जनसामान्यांच्या याच अपेक्षा असून, उच्च न्यायालयाचे तेच आदेश आहेत. त्यामुळे आता सेवाभावी मंडळांनीच याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरात दरवर्षी श्रींचा उत्सव सर्वांच्या सहकार्यामुळेच निर्विघ्नपणे पार पडतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्सवामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. सर्वाधिक रहदारीचे रस्ते असतानाही त्यावर मोठ मोठे मंडप टाकले जातात. त्यावर देखावे सादर केले जातात. सामान्य नागरिकांनादेखील या मंडळांचे देखावे पाहण्यात नेहमीच रस असतो. त्यामुळे या गणेश मंडळांचे देखावे पहायला नागरिकांची नेहमीच प्रचंड गर्दी उसळत असते.उत्सवाचे अखेरचे पाच दिवस तर महानगरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तर प्रशासनाच्या देखील हाताबाहेर जाते. त्यात यंदाच्या वर्षी आधीच सामान्य जनता वाहतुकीच्या चक्रव्यूहाने मेटाकुटीस आली आहे. त्यात जर गणेशोत्सवाचे दहा दिवस आणि त्यापूर्वी मंडप उभारणीसहदेखावे उभारणीचे १० ते १२ दिवस या संपूर्ण काळात जर रस्ते प्रचंड आक्र सले गेले तर संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. त्यामुळे मोठ्या सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या वर्षी तरी हा वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त केली आहे.पूरग्रस्तांना मदत करा !पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे महापूराचे संकट ओढवले. नाशिककरांनाही पुराची झळ पोहोचली. त्यामुळे मंडपाचा आकार आणि उत्सवातील खर्चात काटकसर करून जरा पूरग्रस्तांना मदत केली, तर तेदेखील सकारात्मक पाऊल ठरेल.हेच ठरेल खरे सामाजिक कार्य !सार्वजनिक गणेश मंडळे ही नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. मग आपल्याच शहरात असलेले वाहतूक कोंडीचे संकट दूर करण्यासाठी या सार्वजनिक मंडळांनीच पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.मंडपाचा आकार कमी करून वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था करणे हे या सामाजिक कार्यातील पहिले पाऊल ठरू शकते. सार्वजनिक मंडळांनी तेच पाऊल उचलण्याची गरज आहे.
गणपती बाप्पाला वाहतूक कोंडीतून वाचवू या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:14 AM