.भगवान देवरे
उमराणेतिथी पंचांगाप्रमाणे पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी वरुणराजाचं आगमन लांबणीवर पडत चाललंय. शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या ‘कसमादे’ परिसरात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला; परंतु त्यावर मात करत शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ठिंबक सिंचनच्या साहाय्याने कांदा, डाळींब आदि नगदी पिकांची पोटच्या पोरावानी जपणूक केली. मका पीक तर बिगर पाण्याचे आले. परंतु कांदा व डाळींब पिकाच्या ऐन काढणीच्या वेळीस बेमोसमी गारपीट व पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. परंतु मदत मिळवून देणाऱ्या यंत्रणेत सुसूत्रता नसल्याने शेतात नुसती ढेकळे असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली व खऱ्या अर्थाने गारपीटग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिला ही वस्तुस्थिती आहे. मागील वर्षाच्या अस्मानी सुलतानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पुन्हा नव्याने कंबर कसून मागील वर्षाच्या नुकसानीची तूट भरून काढण्यासाठी गेल्या दीड महिन्यापूर्वीच शेतीची मशागत करत बी-बियाण्यांसाठी तसेच रासायनिक खतांसाठी सज्ज झाला आहे. परंतु पावसाळा सुरू होऊन महिना उलटत आला असतानाही सर्वत्र फक्त जोमाने वारेच वाहत असल्याने पाऊस लांबणीवर पडल्याची चिन्हे दिसत आहेत. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंतच्या समस्यांनी चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. विहिरींनी तर केव्हाच तळ गाठला असून, धरणांमधील जलसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.