नाशिक : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी मराठा क्रांती मोर्चा व आरक्षणाचे नेतृत्व करण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला.मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका झाल्या; परंतु नाशिकमध्ये सर्वसमावेशक झालेली ही पहिलीच बैठक आहे. मराठा क्रांती मोर्चे हे समाजाने सर्व खासदार, आमदार नेत्यांना बाजूला सारून एक होत निर्णय घेतल्याने यशस्वी झाले आहेत. एक नव्हे तर तब्बल ५८ मोर्चे काढण्यात आले. त्यात समाजाची एकजूट दिसून आली. त्यामुळे आजच्या या बैठकीला आपण संभाजीराजे म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून उपस्थित राहिलो आहे. राजे छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन स्वराजाची स्थापना व समानतेचा पुरस्कार केला. परंतु दुर्दैवाने आज ते दिसत नाही. राजेंसोबत असलेले बारा बलुतेदार कोठे गेले, कोठे गेला तो बहुजन समाज असा सवालही त्यांनी केला.मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षण याचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी करावे या ठरावाचा उल्लेख करून, संभाजीराजे यांनी त्यास नम्रपणे नकार दिला; मात्र समाजासाठी कोणत्याही लढाईत सर्वांच्या सोबत व अग्रभागी आपण असू, असे सांगून, २००७ पासून आपण बहुजन व मराठा समाजासाठी बाहेर पडलो व संपूर्ण समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला काही प्रमाणात यश मिळाले, समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना मुंबईतील मोर्चाच्या वेळी आपण मॅनेज झाल्याची टीकाही करण्यात आली.परंतु समाजासाठी कधीही कुठेही अप्रामाणिक राहिलो नाही. ज्या दिवशी मॅनेज झालो असे वाटले त्यादिवशी छत्रपतींच्या घराण्याचे नाव लावून घेण्याची आपली लायकी नसेल, असेही त्यांनी सांगितले.‘सारथी’च्या नेतृत्वाचा विचार करू‘सारथी’ या संस्थेला सरकारकडून अल्पआर्थिक तरतूद करण्यात आल्याबद्दल संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. या संस्थेला सरकारने हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करून सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी म्हणून नेतृत्वाबाबत विचार करू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.