नाशिक : महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे. महापौर हे शहराच्या दृष्टीने मानाचे पद असून, नगरीचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना मान असतो. महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजेच २६ वर्षांत आजपर्यंत यापदाची मानमर्यादा पाळली गेली. महापालिकेच्या प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी किती मतभेद असले तरी या पदाची प्रतिमा कायम जपली गेली. इतकेच नव्हे तर काही महापौरांच्या काळात इतिवृत्त आणि ठराव विलंबाने मिळाले तरी आजवर कोणत्याही प्रशासन अधिकाऱ्याने महापौरांना विचारणा करण्याचा प्रकार घडला नव्हता; मात्र यंदा तो घडला आहे. महापौर रंजना भानसी यांच्याकडे ठराव प्रलंबित असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिवांकडे त्याबाबत विचारणा केली आणि प्रलंबित ठरावासाठी चक्क नगरसचिवांनी महापौरांना पत्र देऊन विचारणा केली. यासंदर्भातील पत्र महापौरांच्या स्वीय सहायकांकडे देण्यात आले होते; मात्र महापौरांनी ते स्वीकृत न करता त्याला केराची टोपली दाखवून नगरसचिवांची झाडाझडती घेतली. महापौर रंजना भानसी यांनी यासंदर्भात सांगितले की, कोणाच्या सांगण्यावरून मी ठराव तत्काळ द्यावे अशी अपेक्षा असेल तर मुळातच चुकीची आहे. कोणत्याही विषयाचा ठराव करताना त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. ठरावाचे बरे वाईट परिणाम तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते.अन्यथा चुकीच्या ठरावांमुळे वेगवेगळे परिणाम संभवतात. त्याच मुळे ठराव पाठविण्यास विलंब होऊ शकतो; परंतु म्हणून कोणी त्यावर जाब विचारू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
प्रलंबित ठरावाबाबत चक्क महापौरांना विचारणारे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:23 AM