लासलगाव : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पत्र दिले. त्याचबरोबर गेल्या आठ दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कांद्याची निर्यातबंदी तातडीने उठवावी यासाठी राज्य कांदा उत्पादन संघटनेकडून निवेदन दिले होते; परंतु फडणवीस यांच्याकडून केंद्र सरकारकडे कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी काही पाठपुरावा केल्याचे काही उत्तर न आल्याने फडणवीस यांनाही आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिष्टमंडळाकडून दुसरे पत्र देण्यात आले आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीसाठी येत्या ४-५ दिवसांत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन मागणी करण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कृषिमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
शिष्टमंडळात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, चंद्रकांत शेवाळे, देवेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे यांचा समावेश होता.