त्र्यंबकेश्वर : पालघरपासून त्र्यंबक तालुका ११० कि.मी. अंतरावर असल्याने तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.पाऊस कमी, पण वादळी वाऱ्याने तालुक्यात दाणादाण उडवून दिली आहे. राज्यात दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या हलक्या, मध्यम सरींबरोबरच वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला.
नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागातील तालुक्यांना या वादळाने तडाखा दिल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील जिल्हा परिषद शाळेचे या वादळाने पत्रे उडाले आहेत. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी सरपंच मंदा मौळे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील आंबा पिकांसह इतर पिकांना फटका बसला आहे.
सलग दोन दिवसांच्या या वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यातच पावसाच्या सरी आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे, विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. या नुकसानीचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी विठ्ठल मौळे, दत्तू डगळे, मधू खोटरे, भगीरथ शेवरे, राजाराम शेवरे, रामचंद्र डगळे, निवृत्ती डगळे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.