नाशिक: पावसाच्या हलक्या सरींचा होणारा वर्षाव... डोळ्यांवर काळी पट्टी बांधत हातात तिरंगा घेत, 100मीटरपर्यंत घेतलेली धाव... सैन्यदलाच्या सज्ज असलेल्या जिप्सीवरील वीस फूट उंचीच्या शिडीवर चढाई अन् टोकावर बांधलेल्या खुर्चीवर क्षणात शीर्षासन मुद्रेत लेफ्टनंट कर्नल लक्ष्मी धार भुयान (Lieutenant Colonel Lakshmi Dhar Bhuyan) यांना बघून उपस्थित सर्वच अचंबित झाले. ऑन व्हिल भुयान यांनी सुमारे 1 तास 13 मिनिटे 8 सेकंद याच स्थितीत यशस्वीपणे शीर्षासन करत पुन्हा एकदा आपलाच स्थिर शिर्षसनाचा विक्रम रविवारी (दि.15) मोडीत काढला. (Lieutenant Colonel Lakshmi Dhar Bhuyan's Unique Record)
नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले लक्ष्मी धार भुयान यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सुमारे तासभर अनोखे ऑन व्हील शीर्षासन करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. येथील ज्ञानी स्टेडियम मैदानावर या आगळ्यावेगळ्या योगामुद्रेद्वारे अनोख्या देशभक्तीचे दर्शन याची देही याची डोळा उपस्थितांना झाले. अन् अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.
याप्रसंगी तोफखाना केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर ए.रागेश, प्रधान जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, न्यायाधीश डी.डी.कर्वे, न्यायाधीश एम.एस.बोराळे यांच्यासह विविध अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
व्यायामपटू, धावपटू आणि योगपटू असलेले भुयान हे मागील 34 वर्षांपासून सातत्याने योगासने करीत आहेत त्यांनी आपल्या अनुभवातून आतापर्यंत 32 योगा सेमिनारमध्ये सहभाग घेतला आहे. चालू वर्षी 15 जानेवारी रोजी सैन्य दिवसाच्या औचित्यावर एकाच ठिकाणी एक तास सात मिनिटांपर्यंत शीर्षासन करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह फर्स्ट बेस्ट ऑफ इंडियन रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले आहे. आता पुन्हा सात महिन्यांनी भुयान यांनी चालत्या जिप्सीवर वीस फूट उंचीवर शीर्षासन करत सुमारे 13हजार 986 वेळा 'हिट ऑन हिप्स बाय हिल्स' केले.
अपंगत्वावर जिद्दीने मात -काही वर्षांपूर्वी रस्ते अपघातात आलेल्या वीस टक्क्यांपर्यंतच्या अपंगत्वावर भुयान यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वीरित्या मात केली आहे. 34 वर्षांपासून त्यांनी योगा आणि व्यायामाचा छंद जोपासला आहे हे विशेष!
जिप्सी चालकाचे उत्कृष्ट सारथ्य - तोफखाना केंद्रातील ज्ञानी स्टेडियमच्या वर्तुळाकार ट्रॅकवर भुयान यांच्या जिप्सीचे यशस्वी सारथ्य करण्याचे आव्हान नायक दिनेश कुमार यांनी लीलया पेलले. अचूक वळणावर योग्यपद्धतीने गियर बदलत 35 ते40 किमी प्रतितास इतक्या वेगाने जिप्सी चालवत दिनेशकुमार यांनी एक्सिलेटर आणि ब्रेक यांचा ताळमेळ सुमारे तासभर टिकवून ठेवला अन भुयान यांच्या जागतिक विक्रमाला मोलाचा हातभार लावला. यावेळी त्यांनी 22 फेऱ्या मैदानाभोवती पूर्ण केल्या.