नाशिक : परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रत्नाकर अहिरे यांनी केले. गोदाघाटावरील नाशिक व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.२२) रत्नाकर अहिरे यांनी सुभाष सुराणा यांच्या स्मृतीत ‘शब्दरुपी अस्त्र, हेच सुखी जीवनाचे मानसशास्त्र’ विषयावर बाविसावे पुष्प गुंफले. त्यांनी उपस्थितांना सकारात्मक विचार करण्याचे आणि बोलतानाही सकारात्मक शब्दप्रयोग करण्याचे आवाहन केले. नकारात्मक विचारांचा बागुलबुवा करून अनेक जण नैराश्येच्या गर्तेत अडकतात आणि त्यांच्या बोलण्यातही नकारघंटा येते. त्यामुळे अशा व्यक्ती ज्या विषयासंबंधी बोलतात अथवा विचार करतात त्यात त्यांना अपयश येते; परंतु सकारात्मक विचारांनी सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा आनंद घेता येतो. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधणे जीवन सुखावणारे असते. त्यामुळे प्रत्येक कृतीतून आनंद घेणे हेच सुखी जीवनाचे शास्त्र असल्याचे मतही अहिरे यांनी व्यक्त केले. आजचे व्याख्यान , विषय- नव्या पिढीच्या समाजासमोरील आव्हाने , वक्ते- अजितकुमार तेलंग (ठाणे)
सकारात्मक शब्दांमुळे जीवन बनते आनंदमयी : अहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:53 AM