इगतपुरी : महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून संततधारेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असून, गेल्या २४ तासात २१३ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात चौफेर दमदार पाऊस झाल्याने नुकतीच लागवड झालेली भाताची शेती पाण्याखाली आल्याने नुकसानीची भीती व्यक्त होत आहे़इगतपुरी शहर व तालुक्यात पावसाने ३६ तासापासून आपला जोर कायम ठेवला आहे. पावसाने शहर व परिसराला अक्षरशा झोडपून काढले असून, शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार (दि.२)अखेर शहरात २00२ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. तालुक्याच्या सहा मंडळातील मंगळवारी झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- (आकडेवारी मिलिमीटरमध्ये ) : इगतपुरी - २१३घोटी- १९३, वाडीवऱ्हे- ९०, धारगाव- ११४, टाकेद- ११४, नांदगाव बु।।- १११ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात एक- दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाला असून, आतापर्यंत सरासरी अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत २२.६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत १७ टक्के पावसाची नोंद झाली होती. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत
By admin | Published: August 02, 2016 11:18 PM