नाशिक : बालपणी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांसह महापुरुषांची चरित्रे आणि रामायणातील कथांचे वाचन केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘माझी जीवनगाथा’ हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचनात आले. त्यातूनच वाचाल तरच जगू शकाल हा मौल्यवान संदेश मिळाला. वाचनामुळेच माझे जीवन समृद्ध झाले, अशी आठवण पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमात भुजबळ बोलत होते. ऑनलाइन पार पडलेल्या कार्यक्रमात ‘माझे वाचन’ विषयावर त्यांनी विचार मांडले.
भुजबळ म्हणाले, लेखक हा प्रकार माझ्यासाठी अवघड होता. मात्र, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रग्रंथ वाचनात आले. त्यामुळे इतिहासाचाही अभ्यास झाला.
बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथा आणि चंद्रकांत काकोडकरांच्या शृंगारिक कादंबऱ्यांबरोबरच व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर यांच्या दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेतला. पुस्तकांसोबत जोडलेली नाळ आणि मैत्री आयुष्यभर उपयोगी पडते. म्हणूनच कोणत्याही कार्यक्रमात पुस्तके भेट द्यावीत, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.
प्रास्ताविक वसंत खैरनार यांनी केले. प्रा. मोहन माळी यांनी पालकमंत्री भुजबळ यांचा परिचय करून दिला. शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी यांनी स्वागत केले.
--------
भुजबळ यांचा सल्ला
राजकारणात रस असलेल्या व्यक्तींनी माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णकाठ’ आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ ही चरित्रे अभ्यासावी, असा सल्ला भुजबळ यांनी दिला. भुजबळ यांच्या या पुष्पाने लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाची सांगता झाली.
-------- फोटो : छगन भुजबळ यांचा वापरावा --------