नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा युवकांना पाच आरोपींच्या टोळीने राजीवनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यावर गाठून तलवार, कोयत्याने सपासप वार करून २७ डिसेंबर २०१७ रोजी ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या अंतिम सुनावणीमध्ये न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व एकूण ३५ हजारांचा दंड ठोठावला.
या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रवी गौतम निकाळजे (२९), दीपक दत्ता वाव्हळ (२५), कृष्णा दादाराम शिंदे (२५), नितीन उत्तम पंडित (२२), व आकाश उर्फ बबलू डंबाळे (२५, सर्व रा. राजीवनगर झाेपडपट्टी) यांनी मिळून रात्री ११ वाजेच्या सुमारास दिनेश नीळकंठ मिराजदार (२२, गणेश चौक, सिडको) व देविदास वसंत इघे (२२, राजीवनगर) यांचा तलवारीने हल्ला करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी रिक्षाचालक रमेश भीमराव गायकवाड (२२, रा. जुने सिडको) याने दिलेल्या फिर्यादीनुसार यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, के. बी. चौधरी यांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. देसाई यांनी या आरोपींना परिस्थितीजन्य पुराव्यांअधारे व साक्षीदारांच्या साक्षनुसार मंगळवारी (दि.१४) अंतिम सुनावणीत दोषी धरले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत न्यायालयापुढे १९ साक्षीदार तपासले. २०१८ सालापासून हा खटला सुरू होता.
हे पुरावे ठरले महत्त्वाचे
न्यायालयात तीन साक्षीदारांचा जबाब, मृतांच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदनाच्या अहवालासह रासायनिक विश्लेषण तज्ज्ञांचा (फॉरेन्सिक एक्सपर्ट) अहवालाच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९ साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले.