नाशिक : आॅर्केस्ट्राची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून घरावर दगडफेक करून कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण तसेच तलवारीने वार करून सलीम इब्राहिम शेख (रा़ देवळाली गाव, रोकडोबावाडी) या इसमाचा खून करणा-या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सीख़टी यांनी बुधवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ देवळालीतील रोकडोबावाडीत ९ मे २०१५ रोजी घडलेल्या या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात सरकारी वकील योगेश कापसे यांनी या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासले़
देवळाली गावातील रोकडोबावाडीत मयत सलीम इब्राहिम शेख हा भाऊ अमजद व कुटुंबियांसह राहत होता़ ८ मे २०१५ रोजी आरोपी जयद्रथ प्रल्हाद काकडे, गजानन प्रल्हाद काकडे, आकाश जयद्रथ काकडे, धनंजय जयद्रथ काकडे हे आॅर्केस्ट्राची वर्गणी मागण्यासाठी गेले असता शेख कुटुंबियांनी वर्गणी देण्यास नकार दिला़ या गोष्टीचा राग आल्याने ९ मे २०१५ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी काकडे यांनी शेख कुटुंबियांच्या घरावर दगडफेक करून त्यांना घराबाहेर काढले़ यानंतर लोखंडी रॉडने शेख कुटुंबियांना मारहाण करून तलवारीने वार केले़ यामध्ये सलीम शेख यांचा मृत्यू तर अमजद शेख व त्यांच्या बहिणी व कुटुंबिय गंभीर जखमी झाले होते़ या प्रकरणी अमजद शेख यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
उपनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील कापसे यांनी या खटल्यात ९ साक्षीदार तपासले़ त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनेतील जखमींचे जबाब, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले़ न्यायाधीश खटी यांनी जयद्रथ काकडे, गजानन काकडे, आकाश काकडे व धनंजय काकडे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ दरम्यान, काकडे बंधुंवर खंडणी, एनडीपीएस आदी विविध गुन्हे दाखल आहेत़