नाशिक : दारुसाठी पैस न दिल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने पत्नीचा खून करून प्रेत जमिनीत पुरून पुरावा नष्ट करणारा पती सुखदेव चंदर मोरे (४४, रा़ धामणगाव, ता़ इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ४ जून २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या खुनातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह आठ जणांची साक्ष नोंदवत सरकारी वकील योगेश कापसे यांनी सबळ पुरावे न्यायालयात सादर केले़
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव अस्वली स्टेशन रोडवरील उंडओहोळ वस्तीवर सुखदेव हा पत्नी गुलाबबाई समवेत राहत होता़ ४ जून २०१६ रोजी सुखदेव याने पत्नी गुलाबबाईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागीतले असता तिने नकार दिला़ त्यामुळे तो लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारत होता़ यावेळी गोंधळाच्या कार्यक्रमासाठी फिर्यादी जगन कचरू माळी व त्याची पत्नी शांताबाई हे जात होते़ त्यांनी सुखदेवला पत्नीला मारु नको असे सांगितले असता त्याने तुम्हाला काय करायचे आहे असे म्हटल्याने ते निघून गेले होते़ गोंधळाच्या कार्यक्रमानंतर परत येत असताना सुखदेव खांद्यावर प्रेत घेऊन जात असताना जगनची पत्नी शांताबाई हिने बघीतले होते़ या प्रकरणी जगन माळी यांच्या फिर्यादीनुसार वाडीव-हे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील कापसे यांनी आठ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी जगन माळी, त्यांची पत्नी शांताबाई, जमिनीतून प्रेत उकरून शवविच्छेदन करणारे डॉक्टर, तहसिलदार यांच्या साक्ष महत्वाची ठरली़ यामध्ये आरोपी सुखदेव मोरे यास दोषी धरीत न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़