राजीव वडगे
मालेगावकाळ बदलला तरी जुन्या खाद्य पदार्थांची आवड मात्र आजही टिकून आहे. मात्र एवढेच झाले की, आपल्याला घरी आजी, आई, काकू जे पदार्थ स्वत: मेहनत घेऊन तयार करीत असत आता तेच पदार्थ तयार स्वरुपात इतरत्र मिळू लागले आहेत. कोकणात मासे तर कोल्हापुरात तांबडा रस्सा तसेच खान्देशात खापरावरील पुरणपोळ्या प्रसिद्ध. आवड म्हणून पुरणपोळ्या बनविणाऱ्या महिलेचा छंद कालांतराने व्यवसाय केव्हा बनला हे तिलादेखील कळले नाही.पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात काम करणारी व खाणारी माणसे खुप असायची. पुरण पोळीच्या स्वयंपाकाची तयारी चार दिवसांपासून सुरू व्हायची. गव्हाचे पीठ तयार करणे आदिंसाठी लगबग सुरू व्हायची. घरातील ज्येष्ठ महिला पहाटे उठून पुरणपोळी तयार करायच्या. अनेक सुखवस्तु कुटुंबात हिवाळयात तर तब्येतीचा खुराक म्हणून पुरणपोळी व गावरानी तुपाचा खास आहार तयार व्हायचा. काळ बदलला विभक्त कुटुंब पद्धतीमुळे चौकोनी कुटुंबे आकारास आली. एवढ्या कुटुंबासाठी पुरणपोळीचा एवढा मोठा धाट घालणे अशक्य होऊ लागले. मात्र पुरणपोळीची लज्जत तर पिच्छा सोडत नव्हती. सन १९९४ पासून सौ. वंदना नंदकिशोर बावीस्कर या संगमेश्वरातील गृहिणीने सहज म्हणून नातेवाईकांना पुरणपोळी तयार करुन दिली तर त्याचा दर्जा व लज्जत आवडून इतरांनी त्यांना प्रोत्साहन देत पुरणपोळी बनविण्याच्या आॅर्डर दिल्या. बघता-बघता छंदाचे रुपांतर व्यवसायात झाले. गुढी पाडवा, अक्षय तृतीया, वटसावित्री पौर्णिमा, दसरा, मकरसंक्रांती आदि सणाला पुरणपोळ्यांना मागणी वाढते. या कामी त्यांना त्यांचे पती नंदकिशोर बावीस्कर व इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या दोन कन्या मदत करतात.