नाशिक : शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. यास वन्यप्राणीदेखील अपवाद नाही, अशाचप्रकारे एका भरधाव वाहनाच्या धडकेत पेगलवाडी फाट्यावर अंदाजे दोन वर्षांचा कोल्हा (मादी) गंभीर जखमी झाला होता. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवप्रेमी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून धाव घेत जखमी कोल्ह्याला 'रेस्क्यू' केले. वन अधिकारी, कर्मचारी यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे वेळेवर प्रथमोपचार मिळाल्याने कोल्ह्याला जीवदान लाभले.नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात हे वन्यप्राणी आपली जागा सोडून भटकंती करतात. गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पेगलवाडी फाट्याजवळ त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलावरुन जाणाऱ्या कोल्ह्याला एका भरधाव वाहनाने धडक दिली. धडकेत कोल्ह्याच्या जबड्याला जबर मार बसला आणि त्याचे दातही तुटले. कोल्हा रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत कठड्यालगत पडलेला होता. याबाबतची माहिती नाशिक वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले आदींनी तत्काळ घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. कोल्ह्याची अवस्था बघून तातडीने त्यास जागेवरच प्रथमोपचार दिले आणि उंटवाडी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात हलविले.प्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्ततासकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्ह्याची तपासणी करुन औषधोपचार दिले. यानंतर कोल्ह्याला वनखात्याच्या वाहनातून पुण्याच्या बावधान येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या रिहॅबिटेशन केंद्रात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. तेथे मागील दोन दिवसांपासून उपचार सुरु असून कोल्ह्याची प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले.
अपघातातील जखमी कोल्ह्याला जीवदान; पुण्याच्या रेस्क्यू केंद्रात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 9:09 PM
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो.
ठळक मुद्देमध्यरात्री दाखविली तत्परताप्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्तता