मालेगाव : मद्य पिण्याच्या वादातून सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात विहीर खोदकाम करणाऱ्या शंकर किशोर सेन रा. मोटरास, ता. बदनोर, जि. राजस्थान याचा खून करणाºया महेंद्र मिठ्ठु भिल रा. सुतेवाडी, ता. बदनोर, जि. राजस्थान याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.११ मार्च २०१६ रोजी सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात ही घटना घडली होती. पारनेर शिवारातील रघुनाथ देवरे यांच्या शेतातील विहिरीे खोदकामाचा ठेका मयत शंकर सेन यांनी घेतला होता. सदर विहिरीवर कारागीर म्हणून मयत सेन व त्याचा मुलगा मुकेश सेन तसेच महेंद्र मिठ्ठू भिल, त्याची पत्नी काम करीत होते. ११ मार्च २०१६ रोजी मयत शंकर सेन व आरोपी महेंद्र भिल्ल मद्य सेवन करीत होते. यावेळी मयत शंकर सेन याने महेंद्र भिल्ल याला तू उशिरा कामावर का येतो, काम व्यवस्थित का करीत नाही, असा जाब विचारला असता त्याचा राग येऊन महेंद्र भिल याने लोखंडी पहार हाणून शंकर सेन याच्या डोक्यावर गंभीर मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा खटला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यास १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. संजय सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पांढरे यांनी साहाय्य केले.
खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:53 PM