मालेगाव कॅम्प, जि. नाशिक (किशोर इंदोरकर): येथील एका उंच पिंपळाच्या झाडावर दीडशे फूट उंचीवर मांजामध्ये अडकलेल्या घारीला सर्पमित्रांनी सुटका करीत जीवदान दिले. येथील श्रीरामनगरजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील श्री बुद्ध विहार परिसरात जुने, डौलदार सुमारे दीडशे फुटांहून अधिक उंचीच्या पिंपळाच्या झाडावर फांदीमध्ये मोठी घार पतंगीच्या मांजात पूर्णपणे अडकून पडली होती.
दोन दिवसांपासून तिचे विव्हळणे ऐकू येत होते. सामाजिक कार्यकर्ते अमृत ढिवरे यांना ही बाब माहिती पडली. त्यांनी घारीच्या सुटकेचा थोडा प्रयत्न केला व नंतर सर्पमित्र बिपिन मगरे यांना बोलवले. मगरे यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही फांद्या कमकुवत असल्याने मोठा सुमारे शंभर फुटी बांबूला कटर बांधून उंचावर जात घारीच्या आजूबाजूला असलेला मांजा कापला. घारीच्या पूर्ण शरीराला मांजा गुंडाळून गेला होता. त्यामुळे जोखीम होती. दोन तासांच्या प्रयत्नात घारीला मांजातून सुटका मिळाली.
दरम्यान, हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. मगरे यांच्या समवेत त्यांचे सहकारी दिनेश चव्हाण सहभागी झाले होते. घारीला मुक्त केल्यानंतर तिला मालेगावातील वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले व तिच्यावर योग्य ते उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे अधिकारी हिरे यांनी सांगितले.