लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात शनिवारी (दि.२४) वरुणराजाने सकाळी हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेली संततधार व ढगाळ हवामानामुळे नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले. शहरासह जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील दोन ते तीन दिवस मान्सून सरींचा वर्षाव समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. चालू महिन्यात बुधवारी (दि.१४) शहरात दीड तास मुसळधार पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडविली होती. शनिवारी झालेल्या संततधारेने शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५४ मि.मि. पावसाची नोंद झाली होती. तब्बल बारा दिवसांनंतर पुन्हा शनिवारी सकाळपासूनच शहरासह उपनगरीय भागांमध्ये जोरदार संततधारेला सुरुवात झाल्याने मान्सून सक्रिय झाला. सकाळपासून ढगाळ हवामान आणि पावसाची संततधारेमुळे नाशिककरांना सूर्याचेही दर्शन होऊ शकले नाही.नाशिकरोड परिसरात व आजुबाजूच्या भागांमध्ये शनिवारी पहाटेपासुन दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकरोड व आजुबाजूच्या भागांमध्ये गेल्या पाच-सात दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उन्हाचा चटका काही प्रमाणात जाणवत होता. मात्र शनिवारी पहाटेपासुन नाशिकरोड व आजुबाजूच्या भागांमध्ये दिवसभर रिमझीम पाऊस सुरू होता. एकसारखा पाऊस पडत असल्याने रस्त्याच्या आजुबाजूला व उघड्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली नव्हती. तर पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ देखील कमी झाली होती. पावसाच्या सरी एकसारख्या पडत असल्याने सर्वत्र पाण्यामुळे चिकचिक झाली होती. पावसामुळे सर्व व्यवसायावर कमी-जास्त परिणाम झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही भागांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. तर वीजेचा लपंडाव देखील सुरू होता.
जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 25, 2017 12:16 AM