लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथे शेतकरी संपास तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. चांदवड शहरातील दूध विक्री केंद्र व भाजीपाला विक्री केंद्र बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपाच्या पहिल्या दिवशी गृहिणींनी अधिक दूध घेऊन ठेवल्याने फारशी अडचण जाणवली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दुधाची तीव्र टंचाई जाणवू लागली. अनेकांनी कोरा चहा पिऊन दिवस पास केला. त्यात काहींनी तर पावडरच्या दुधाला पसंती दिली. संपामुळे सर्वसामान्यांसह लहान मुलांचे दुधावाचून मोठे हाल झाल्याचे दिसून आले. शहरी भागातील परिस्थिती व ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात शेतकरी समाज जास्त असल्याने या संपाची तीव्रता ग्रामीण भागात जास्त जाणवून आल्याचे बोलले जात आहे. एक वेळ भाजीपाला नसला तरी प्रत्येक गृहिणी दाळी करुन आपली उपजीविका भागवत असली तरी दुधाची तीव्रता जास्त जाणवत होती. पहिल्याच दिवशी हॉटेल व दूध विक्री केंद्र बंद झाल्याने बसस्थानक, पेट्रोलपंप, बाजारात चहाच्या टपऱ्या व हॉटेलमध्ये चहा मिळत नसल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, चांदवड तालुका अॅग्रो डिलर्स असोसिाएशनच्या वतीने किसान क्रांती आंदोलनाच्या संपास पाठिंबा दिला असून, शुक्रवारी तालुक्यातील खते , बि-बियाणे विक्रीकरणाऱ्या दुकानदारांनी एकदिवसीय बंद पाळून संपात सहभाग नोंदविला. या संपाबाबतचे निवेदन चांदवडचे तहसीलदारांना देण्यात आले. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
चांदवडला संपामुळे जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 04, 2017 1:17 AM