त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा-महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा गाठावी कशी असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी जे मिळेल त्या वाहनाची वाट बघत लागते. त्यातही जागा मिळेल याची शाश्वती नाही. मात्र, शिक्षणाच्या काळजीपोटी विद्यार्थी मिळेल त्या जागेवरून प्रवास करत आपली शाळा गाठतात.
अव्वाच्या सव्वा भाडे
कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दोन वर्ष पूर्णपणे वाया गेले. नेटवर्कअभावी व महागड्या रिचार्जअभावी ऑनलाइन अध्ययन पद्धती प्रभावी न ठरल्यामुळे शाळा सुरू होते न होते विद्यार्थ्यांनी शाळेची वाट पकडून शिक्षणाची कास धरली. मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांची परवड होत असून, खासगी वाहनांच्या पर्यायामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातही जागा नसेल तर कधी टपावर तर कधी लटकून असा दररोजच प्रवास करावा लागत आहे.
सन १९९८-९९ या वर्षात देवगाव शासकीय आश्रमशाळा फक्त मुलींसाठीच रूपांतर झाल्यानंतर देवगाव परिसरातील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली. देवगावसह चंद्राची मेट, हुंबाची मेट, बोरीचीवाडी, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याची मेट, बर्ड्याचीवाडी, वावीहर्ष, झारवड बु. आदी गावांतील विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा किमी असलेल्या वैतरणा येथील शाळेची वाट धरली. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड झाली असून, आता तर बसअभावी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
अनेक समस्यांचा डोंगर
ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. पण कोविडनंतर शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने एसटी संपामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवनवाहिनी मानली जाते, मात्र एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात, थंडी गारठ्यात विद्यार्थ्यांना वाहनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जात आहे, तर शिक्षणालादेखील ब्रेक लागत आहे.