सिन्नर : मुंबई ए.आर.ओ. लष्करी भरतीवरील स्थगिती त्वरित उठवावी, तसेच कोरोनात गेल्या दोन वर्षांपासून लष्करी भरतीची संधी हुकलेल्या तरुणांना भरतीसाठी नव्याने वयोमर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सैन्य भरतीप्रक्रिया रखडल्याने तालुक्यातील तरुणांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावर कोकाटे यांनी तातडीने या दोन्ही मंत्र्यांना पत्रव्यवहार केला. आता मुंबई ए.आर.ओ.ची ४ नोव्हेंबरपासून भरतीप्रक्रिया आहे व त्यामध्ये नाशिक, धुळे, ठाणे, रायगड, मुंबई या पाच जिल्ह्यांची भरती आहे. कोरोना काळात भरती रखडल्याने अनेक जण वाढलेल्या वयामुळे बाद ठरणार आहेत. त्या तरुणांसाठी दोन ते तीन वर्षे वयोमर्यादा वाढवून त्यांना देशसेवा करण्याची संधी द्यावी. ४ नोव्हेंबरपासून होणारी भरतीप्रक्रिया पुढे ढकलू नये. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरतीप्रक्रिया पुढे ढकलली तरीसुद्धा ज्यांची वयोमर्यादा संपत आहे त्यांना संधी द्यावी. एकाच जिल्ह्यात भरतीसाठी जास्त गर्दी होत असेल, तर प्रत्येक जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवावी. त्यामुळे गर्दीही होणार नाही आणि भरतीचा उद्देश साध्य होऊन मुलांना देशसेवा करण्याची संधी मिळेल. इतर राज्यांच्या धर्तीवर मुंबई ए.आर.ओ. लष्करी भरतीवरील स्थगिती उठविण्यासाठी आणि वयोमर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचनाही कोकाटे यांनी केली आहे.
मुंबईच्या लष्कर भरतीवरील स्थगिती उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:19 AM