चांदोरी : निफाड तालुक्यात गोदाकाठ भागात अचानक वातावरणात बदल झाला असून, गुरुवारी व शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.
शेतकऱ्यांची उघड्यावरील शेतीमाल झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. गोदाकाठ व चांदोरी पंचक्रोशीत हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष उत्पादक तसेच इतर पिके घेणारे शेतकरी धास्तावले आहेत. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे या पिकांना वाढीस फटका बसू शकतो, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे. रब्बीतील पिकांना थंडीची खूप आवश्यकता असते व या झालेल्या वातावरण बदलामुळे थंडी पुन्हा गायब झाली असून, थंडीच्या आगमनानंतर या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नव्हते. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाला सुरुवात करत पेरणीला सुरवात केली; मात्र मात्र डिसेंबर महिना अर्धा होत चालला तरी पिकाला पोषक अशी थंडी नसल्याने रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आला असून, शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे.
----------------
गुरुवारपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांना अनेक औषधे फवारणी करावी लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक पिकांवर बुरशी व इतर रोग येण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याची मोठ्या प्रमाणात धास्ती भरली आहे. या वातावरण बदलामुळे रासायनिक औषधे फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
------------------
ढगाळ वातावरण झाल्यामुळे पिकांवर फवारणी करताना शेतकरी. (११ चांदोरी)
===Photopath===
111220\11nsk_2_11122020_13.jpg
===Caption===
(११ चांदोरी)