नाशिक : प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला उद्यापासून (दि. २०) प्रारंभ होत असून, उद्या वसूबारसनिमित्त गाय-वासराची पारंपरिक पूजा केली जाणार आहे.वसूबारसने दिवाळीला सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीत गायीला मातेचे स्थान दिले जात असल्याने तिच्या पूजेला मोठे महत्त्व असते. वसूबारसच्या या पूजेपासूनच दिवाळीची सुरुवात होते. परंतु पूजेसाठी गाय मिळत नसल्याने गायीच्या प्रतिरूपाला मागणी वाढली असल्याचे चित्र आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वसूबारसला गाय शोधून पूजा करणे अवघड झाले आहे. गोठ्यात जाऊन पूजा करण्यासाठीही गोठ्याच्या मालकाची परवानगी काढावी लागते. त्यासाठी बराच वेळ खर्ची घालावा लागत असल्याने वसूबारसच्या निमित्ताने महिलांनी गायीच्या या प्रतिरूपाला पसंती दर्शविली आहे. चांदी, व्हाईट मेटल, आॅक्साईड या धातूंपासून गायींचा हा प्रकार बनविण्यात येतो. दिवाळीच्या आठ दिवस आधीच या स्वरूपाच्या गायींना मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)