पेठ - वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे पेठ तालुक्यात भारनियमनाचे वेळापत्रक कोलमडले असून ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत हरणगाव व आसरबारी परिसरातील सरपंच व शेतकऱ्यांनी तहसीलदार हरिष भामरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. तालुक्यात यावर्षाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला असला तरी अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. ऐन दाणा भरण्याच्या वेळी पाऊस गायब झाला. त्यामुळे भात व नागलीच्या पिकांना फटका बसला आहे. हातची गेलेली पिके वाचवण्यासाठी नदीकाठी व धरण परिसरात असलेले शेतकरी मिळेल तेथून पाणी उपसण्याची धडपड करत आहेत. मात्र वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त भारिनयमन व कोलमडलेले वेळापत्रक शेतक-यांच्या मुळावर ऊठले आहे. तासनतास वीज गायब होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. ठरवून दिलेल्या वेळापत्रकात वीज नसतेच शिवाय अतिरिक्त वेळेतही वीजेचा लंपडाव सुरूच राहत असल्याने पाणी असूनही शेतक-यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर तात्काळ कारवाई करून किमान आगामी एक महिना वीजेचे भारिनयमन रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. निवेदनावर आसरबारी, हरणगाव, जोगमोडी, कोपुर्ली परिसरातील शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
पेठ तालुक्यात विजेचा लपंडाव, शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 4:48 PM
पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती
ठळक मुद्देकितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे