नायडोंगरी : रेल्वेच्या बोगीवर चढलेल्या तरु णाचा विजेच्या ओव्हर हेड तारेला स्पर्श झाल्याने एखादा बॉम्ब स्फोट व्हावा तसा आवाज होऊन सदर तरु ण ४० ते ५० फूट दूरवर फेकला गेल्याची घटना न्यायडोंगरी रेल्वे स्थानकावर घडली. सदर तरुण विजेच्या धक्क्याने सुमारे ५० टक्के भाजला असून ३० फूट उंचीवरून जमिनीवर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने न्यायडोंगरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२७) येथील आठवडे बाजार असल्याने झालेल्या धमाक्यामुळे एकच धावपळ उडून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तुळशीराम सुभाष पवार (वय २५, राहणार- मंगळणे, ता. नांदगाव) असे जखमी युवकाचे नाव असून श्रावणी सोमवार निमित्त पिनाकेश्वर महादेव येथे भरलेल्या यात्रेत तो दर्शन घेऊन परत घराकडे जात होता. न्यायडोगरी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे लाइन ओलांडण्यासाठी पुलाची सोय नसल्याने सर्वांनाच रूळ ओलांडून जावे लागते. त्यामुळे तुळशीरामही रूळ ओलांडीत असतांना मधेच डाऊन लाईनवर डिझेल व पेट्रोलने भरलेली टँकरची माल गाडी उभी होती. तुळशीराम हा गाडी खालून न जाता पेट्रोलच्या टँकर (बोगी) वर चढून लाइन ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याचे डोक्याचे केस विजेचा २५ हजार व्होल्टेजचा प्रवाह सुरू असलेल्या तारेस स्पर्शून गेल्याने तो पूर्णत: होरपळून निघाला. दरम्यान जखमीस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र नवरे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठविले. जर सदर युवक लांब फेकला न जाता तेथेच पेटला असता तर संपूर्ण पेट्रोलने भरलेल्या आग गाडीनेच पेट घेऊन गाव बेचिराख होण्यास वेळ लागला नसता. त्यात सोमवारी आठवडे बाजार होता.हेड फोनने केला घातसदर तरुण रेल्वे बोगी वर चढत असताना अनेक लोकांनी ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कानात हेड फोन लावलेला असल्याने त्यास ऐकू गेले नाही. त्यामुळेच हा प्रसंग घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. केवळ रेल्वे लाइन ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने येथे नेहमीच अपघात होऊन अनेकांचे प्राण गेलेले असतानाही रेल्वे प्रशासन मात्र या कडे लक्ष देत नाही.