सटाणा : संपूर्ण शहरातील उघड्यावरील सर्वच वीजवाहिन्या लवकरच भूमिगत होणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनेतून होणाऱ्या कामासाठी नगरपालिकेमार्फत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातील उघड्या वीजवाहक तारा भूमिगत करण्याचा महत्त्वपूर्ण कामास लवकरच सुरु वात होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.नगरपालिकेच्या पाठपुराव्यातून शहरातील देवमामलेदार रथमार्गावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर शहरातील सगळ्याच उघड्यावरील वीजवाहक तारा भूमिगत करण्यासाठी नगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला. यासाठी केंद्र शासनाच्या आयपीडीएस योजनेत समावेश होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांचेमार्फत मुंबई येथील प्रतापगड कार्यालयात सादर करण्यात आला आहे, असे पुढे बोलताना नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. यापूर्वी रथमार्गावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी रस्त्याच्या खोदकामाकरिता तत्कालीन नगरपालिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यास वीज वितरण कंपनीने नकार दिल्याने ते काम बारगळले होते. परंतु दरम्यानच्या काळात शासनाने अशी नुकसानभरपाई देण्याची गरज नसल्याचे परिपत्रक काढल्याने नगर परिषदेने नुकसानभरपाई न घेता रथमार्गावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू करून घेतले, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे काम सुरू असतानाच दुसरीकडे नगर परिषदेकडून नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात ५८ किलोमीटर नव्याने पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. तसेच भुयारी गटार योजनेअंतर्गतही शहरातील जवळपास ७६ किलोमीटर रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार रस्ते खराब करून शासकीय निधीचा अपव्यय टाळून नगर परिषदेने एकाचवेळी हे तीनही कामे तडीस नेण्याचे ठरवले आहे, असेही मोरे यांनी सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष महेश देवरे, गटनेता राकेश खैरनार, नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती पुष्पा सूर्यवंशी, शमीम मुल्ला, भारती सूर्यवंशी, संगीता देवरे, निर्मला भदाणे, नगरसेवक बाळू बागुल, सुनीता मोरकर, राहुल पाटील, सोनाली बैताडे, आरिफ शेख, आशा भामरे, रूपाली सोनवणे, सुवर्णा नंदाळे, दीपक पाकळे, सुरेखा बच्छाव, शमा मन्सूरी, विद्या सोनवणे आदी नगरसेवक उपस्थित होते.
वीजवाहक तारा होणार भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 6:41 PM
संपूर्ण शहरातील उघड्यावरील सर्वच वीजवाहिन्या लवकरच भूमिगत होणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनेतून होणाऱ्या कामासाठी नगरपालिकेमार्फत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकेंद्राची योजना : सटाण्यात पाणीपुरवठ्यासाठी ५८ किलोमीटरची पाइपलाइन