नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे अंगावर वीज पडून अलका शिवाजी बुरकुल व शेखर शिवाजी बुरकुल हे मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) घडली आहे. नायगाव-जायगाव रस्त्यावरील बुरकुल वस्तीवरील अलका बुरकुल (४६), शेखर बुरकुल (२३) व वर्षा पानसरे शेतातील भुईमूग व उडदाचे पीक बैलगाडीतून नेत होते. मात्र, अचानक वीज पडल्यामुळे अलका व शेखर बुरकुल हे माय-लेक गंभीर जखमी झाले. वस्तीवरील लोकांनी जखमींना खासगी दवाखान्यात दाखल केले. शेखरच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.तर अलका या किरकोळ जखमी झाल्या आहेत. वर्षा पानसरे व बैलजोडी सुखरूप असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंगावर वीज पडून मायलेक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:30 AM