वृक्षरोपणाचा सामाजिक उपक्रम
नाशिक : कोरोनामुळे मृत झालेल्या आपल्या आप्तेष्टांच्या नावे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम शहरातील अनेक भागात राबविला जात आहे. उपनगर येथे युगांतर फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम राबविला जात असताना पंचवटी परिसरातदेखील काही नागरिकांनी या उपक्रमाला सुरूवात केली आहे.
ग्रामीण भागात वाढली घरफोडी
नाशिक : कोरोनामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना ग्रामीण भागात चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून चोरटे घरफोडी करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकाच दिवशी दोन - दोन घरफोड्या केल्याच्या घटनादेखील घडल्या असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
दुचाकी चोरीच्या तक्रारी दुर्लक्षित
नाशिक : दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार घेऊन जाणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहा, असे सांगून पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. अगेादर दुचाकीचा शोध घ्या, नंतर तक्रार दाखल करण्याचे पाहू, असे सांगितले जात असल्याने अनेकांची तक्रार महिनाभरानंतर दाखल झाल्या आहेत.
बससेवा सुरू होण्याआधीच मागणी
नाशिक : महापालिकेची शहर बससेवा सुरू होण्यापूर्वीच आपल्या परिसरातून बससेवा सुरू करण्याबाबतची मागणी होऊ लागली आहे. मनपाने सध्या नऊ मार्गांवर बसेस चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी इतर मार्गावरूनही बसेस सुरू करण्याची मागणी होतांना दिसत आहे. सध्या जादा उत्पन्न देणाऱ्या मार्गांचा विचार महापालिकेने केला आहे.
गुन्हेगार सुधार योजना राबवावी
नाशिक : शहरात राबविण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील योजना राबविण्याची मागणी होऊ लागली आहे. शहरात पोलीस ठाणेनिहाय राबविण्यात आलेल्या योजनेत गुन्हेगारांना सुधारण्याची संधी तसेच रोजगारदेखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामीण भागातून अशा योजनेची मागणी होऊ लागली आहे.