जळगाव निंबायती : करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता, त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. यंदाही त्याची सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत.अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत. ज्यांच्याकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणावर मर्यादा येत आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून आयडिया व वोडाफोन यांचे टॉवरच बंद आहेत. एअरटेलचे टॉवर सुरू आहे परंतु नेटवर्क मिळत नाही. मिळाले तरी ते खूप धिम्यागतीने चालते.काही ठिकाणी तर तेही चालत नाही. त्यामुळे अनेकांनी जिओचे कार्ड घेतले. परंतु जिओला देखील सर्वच ठिकाणी नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे याचा फायदा फक्त शहरातील व शहरा जवळ असणार्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. वाड्यावस्त्यावरील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना संकेतस्थळ डाऊनलोड करता येत नाही. काहींना त्याची माहिती नाही. काहींना माहिती आहे तर नेटवर्क मिळत नाही, अशी स्थिती आहे.
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:52 PM