नाशिकरोड : लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्र सर्व लिंगायत समाजबांधव महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा, लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना इतर मागासवर्गीय आरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी रविवारी नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील स्टार झोन मॉल येथेउत्तर महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील महिला तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. यावेळी विविध जातीधर्मातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लिंगायत समाजाला विविध मागण्यांसाठी आपला पाठिंबा व्यक्त केला.लिंगायत समाजाचे नेते काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली शिखरेवाडी येथील स्टार झोन मॉल येथून महामोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. मध्यभागी एका रथामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या वेशभूषेतील कार्यकर्ता सहभागी झाला होता. त्यानंतर लिंगायत समाजबांधव ‘भारत देशाजी, बसवेश्वराजी’, ‘लिंगायत धर्म की जय’, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. एका रांगेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला. त्यानंतर महामोर्चा लिंगायत संघर्ष समिती शिष्टमंडळ यांच्या वतीने सहायक आयुक्त संदीप माळोदे यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या महामोर्चात सरला पाटील, सुशीला आंदोळकर, शैला तोडकर, अनिल चौघुले, वसंतराव नगरकर, चंद्रशेखर दंदणे, प्रमोद वेरुळे, आनंद दंदणे, संदीप झारेकर, संजय फोलाणे, वसंतराव घोडके, अॅड. उमेश पाचपाटील, वैभव वाळेकर, रवींद्र गाडे, मनोज फत्तरफोडे, दुर्गेश भुसारे, अरुण आवटे, सिद्धेश्वर दंदणे, अरुण कस्तुरे, स्वप्नील कानडे, अरुण जोंधळे, प्रवीण झळके, सुनील कवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी लिंगायत, माझा धर्म लिंगायतमोर्चेकऱ्यांनी मोर्चात मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा असलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. मोर्चेकºयांच्या हातात महात्मा बसवेश्वर फोटो छापलेले भगवे झेंडे होते. मोर्चामध्ये फलक व झेंडे घेऊन सहभागी झालेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा सुरू होती.विशेष म्हणजे या महामोर्चात एक शंभर वर्षाच्या आजीबाई देखील सहभागी झाल्या होत्या.तर एका लहान मुलाच्या डोक्यावरील केसात मी लिंगायत अेस कोरलेले होते. एकंदरीत महामोर्चात अबालवृद्धाचा देखील सहभाग दिसून आला.