देवळा : तालुक्यात समाजमाध्यमांवर चित्रफितीच्या रूपात फिरत असलेल्या सिंहाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, दिवसभर दहिवड व पंचक्रोशीतील नागरिक भीतीखाली वावरत होते. याबाबत वनविभागाने तातडीने तपास करून नागरिकांना वस्तुस्थितीचे आकलन करून देत तो प्राणी तरस असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चित्रफितीच्या माध्यमातून अफवा पसरवत असलेल्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दहिवड येथील भवरी मळा परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सिंहसदृश वन्यप्राण्याने धुमाकूळ घातल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी देवळा वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी यांनी त्वरित या परिसराला भेट दिली. दि. ११ रोजी दिवसभर संबंधित परिसरात या प्राण्याच्या पाऊलखुणा आदी गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. परीसरातील नागरिकांकडून वनविभागाने याबाबत माहिती घेतली. परंतु सिंह प्रत्यक्ष बघितला असल्याची माहिती देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तसेच या परिसरात आढळून आलेली एका वन्यप्राण्याची विष्टा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर ती तरसाची असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
___दहिवड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नेहमी दिसून आला आहे. या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात संजय देवरे यांची एक वासरी, बाळू शिंदे यांचे घोड्याचे शिंगरू, दोन मेंढ्या, विनोद शिंदे यांच्या दोन मेंढ्या, शांताराम शिंदे यांचे दोन घोडे, चार मेंढ्या, सुनील शिंदे, कौतिक शिंदे यांच्या प्रत्येकी तीन मेंढ्या आदींसह अनेक शेतकऱ्यांची अंदाजे ४० ते ५० पाळीव जनावरे ठार झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
--------------------
___ आपल्या परिसरात बिबटे, लांडगे, रानडुक्कर, मोर, ससा तसेच तरस आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. सिंह असल्याची अफवा पसरविण्यात आलेला प्राण्याचा शोध घेतला असता तो तरस असल्याचा अंदाज आहे.
सिंह दिसल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविणाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
_ व्ही. बी. पाटील
(वनपरिक्षेत्र अधिकारी, देवळा )