नाशिक : कोविड रुग्णांची संख्या वेगाने घटत असली तरी सध्याच्या सेवांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांच्या कामात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. यदाकदाचित जर पुन्हा कोविडची लाट आलीच तर त्यासाठी सज्ज राहण्याच्या इराद्याने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारणीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातही सिव्हिलच्या रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा कधीच जाणवणार नसल्याची ग्वाही जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास सलग तिसऱ्यांदा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात वेगाने घट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. रावखंडे यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न- जिल्ह्यात कोविड रुग्ण घटत असल्याने रुग्णांसाठीच्या साधनसुविधांमध्ये काही फेरबदल केले जाणार आहेत का ?
डॉ. रावखंडे - कोविड रुग्णसंख्येतील घट ही बाब अत्यंत समाधानकारक असली तरी कोणत्याही परिस्थितीत साधनसुविधा किंवा खाटांमध्ये कपात केली जाणार नाही. सध्या सणांचा माहोल असल्यामुळे कधीही वाढू शकणाऱ्या रुग्णांचा विचार करुनच सर्व तयारी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
प्रश्न-. नाशिकसह अन्य तीन तालुक्यांच्या प्रस्तावित ऑक्सिजन टँकची स्थिती काय आहे ? कधीपर्यंत पूर्णत्वास येतील ?
डॉ. रावखंडे - नाशिकला २० केएल इतका मोठ्या क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक तर मालेगाव, कळवण आणि चांदवडला ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून येत्या दोन महिन्यात त्यांचे काम पूर्णत्वास जाईल.
प्रश्न- नॉनकोविड रुग्णांवरील उपचार, ऑपरेशन्स पून्हा पूर्ववत कधीपासून सुरु होणार ?
डॉ. रावखंडे - नॉनकोविड रुग्णांमध्ये तातडीच्या शस्त्रक्रीयांना प्राथमिकता देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही शस्त्रक्रीया टाळण्यात आलेल्या नव्हत्या. नॉनकोविडसाठी नियमित उपचार आणि शस्त्रक्रीया सुरुच असल्या तरी कोरोनाच्या धास्तीने रुग्ण येण्याचे प्रमाणच घटले होते. मात्र, गत आठवड्यापासून त्यातदेखील बऱ्यापैकी मोठी वाढ झाली असून आता पूर्वीप्रमाणेच रुग्णदेखील येतील अशी चिन्हे आहेत.