मालेगाव कॅम्प : शहरात शासकीय नियमानुसार लॉकडाऊन सुरू असून, त्यानुसार सर्वत्र व्यावसायिकांना व्यवसायाची मुभा मिळाली आहे. मार्च ते सप्टेंबर या सहा महिन्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, व्यवसाय सुरू होते, तर यात शासनाला भरघोस महसूल मिळवून देणारा मद्यविक्री व्यवसाय या दरम्यान ठप्प होता. त्यामुळे एक-दोन वर्षांच्या तुलनेत देशी मद्यविक्रीत सुमारे सहा ते सात लाख लीटर, विदेशी मद्यविक्रीत तब्बल अडीच लाख लीटर तर बिअर विक्रीत सुमारे चार लाख लीटर इतर मद्य कमी विक्री झाली. यामुळे या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
देशात कोरोनाचे संकट इतके भयानक परिस्थितीकडे घेऊन जाईन असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत नव्हते. सर्वत्र जीवनमान ठप्प झाले होते. यातून मालेगाव कामगारांचे शहर हेदेखील गुरफटले होते. मार्च, एप्रिलनंतर शहर रस्ते आदी शुकशुकाट होता. सर्वत्र उद्योगधंद्यासह मद्यप्रेमींसाठीचे बिअरबार, परमिट रूम, वाईन शॉप, देशी दारू दुकाने आदी बंद होते. या व्यवसायातून सर्वात जादा महसूल मिळतो, अशी माहिती आहे. शहरात मालेगाव विभागात १० वॉईन शॉप, ८३ बिअर बार, ४६ देशी दारू दुकाने, ८ बिअर शॉपी आहेत. हे सर्व लॉकडाऊन काळात पूर्णत: बंद होती. त्यामुळे मद्यपींची हतबलता वाढली होती, तर काही व्यक्तींना या काळात इतर ठिकाणाहून मद्य मिळत होते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
शहरात कोरोना लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंसह मद्यविक्री सुरू ठेवण्याची अपेक्षा मद्यप्रेमींनी व्यक्त केली होती, तर याबाबत सोशल मीडियावर अनेक मजेदार संदेशांची देवाण-घेवाण होत असे. आता सर्व व्यवसायांसह मद्यविक्री केंद्र नियमित सुरू झाली आहेत, तर यामधून सहा-सात महिन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी काही ठिकाणी मद्य दरविक्रीत किरकोळ वाढ झाली असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. आता सर्वत्र व्यवसाय आलबेल सुरू असल्याने पुन्हा नव्याने असे संकट दुबार येऊ नये, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. तर नवीन नियमांनुसार या ठिकाणांच्या वेळेत काही प्रमाणात वाढ करण्याचा सूर विक्रेत्यांचा आहे. तरी पुन्हा सुरळीत मद्यविक्री व्यवसाय सुरू झाल्यामुळे मद्यविक्रेते व मद्यप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट :-
तीन वर्षांचा मद्यविक्रीचा घसरता आलेख
मद्य प्रकार - २०१८/१९ - २०१९/२० - २०२०/२१ (डिसेंबर २० पर्यंत.)
देशी मद्य - २७,७२,१८७ - २६,१६,०६९ - २०,३८,७८७
विदेशी मद्य - १०,०७,०९६ - ९,६७,६६६ - ७,२३,१८६
बिअर - ९,०१,४३७ - ७,७७,४७१ - ३३,५७८
वरील सर्व माहिती लीटरमध्ये असल्याचे मालेगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.